Thursday, July 12, 2012

शोधिशी मानवा !

 उत्तम कांबळे



पृथ्वी सूर्याभोवती फिरतेय हा सिद्धान्त मांडला गेला तेव्हा काय काय घडलं आठवा... निसर्गातला देव माणसानं स्वत-त आणून अहंब्रह्म म्हटलं तेव्हा काय काय घडलं आठवा... एवढंच काय, देवाच्या दर्शनासाठी कुठं पाणी पेटलं आणि कुठं इमारत हलली, हेही आठवा गड्यांनू...

रोज नऊ वाजता येणारी मोलकरीण आज तब्बल दीड तास उशिरा, म्हणजे साडेदहा वाजता, आली...आता काय होणार, याचा अंदाज यायला वेळ नाही लागला...मोलकरणीला होणाऱ्या उशिरातून झालेली अनेक महायुद्धं मी स्वत- पाहिली होती...आता हे आजचं महायुद्ध कितवं... हजारावं, दोन हजारावं...सांगता येत नव्हतं...पण मोलकरीण मोठी हुशार, आत पाऊल टाकताच ती म्हणाली, ""ताई, देवाला जाऊन आले. वाटंतच भंडारा होता... ही ।। गर्दी देवासाठी... देवधर्म कुणाला सुटलाय का ताई..?''

तिच्या उशिरावरून होणाऱ्या संभाव्य महायुद्धाची चाहूल न ऐकताच ती बोलू लागली...बोलता बोलता काम करू लागली...ताईनं एक शब्दही काढला नाही. कारण, मोलकरणीनं आज थेट देवाचं अस्त्र वापरलं होतं. तसं आपलं जीवन मोलकरणीशी जसं जोडलंय, तसं देवा-धर्माशीही जोडलं गेलंय. अलीकडं बायकाही मोलकरीण आली, की "बरं झालं बाबा जणू देवच आला', असं म्हणत सुटकेचा श्‍वास सोडतात...नाहीतर आपले काही देवही जातातच, की जातं ओढायला, भांगलायला, चिखल तुडवायला...

मोलकरणीनं आज वापरलेलं देवास्त्र थोडं वेगळं वाटलं मला. कारण, चारच दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये असंख्य शास्त्रज्ञांनी मिळून चाळीस वर्षांच्या अथक्‌ प्रयोगानंतर देवकण शोधून काढल्याची बातमी थडकली. माणसाचं एक बरंय, त्याला कणात, मनात, रेणूत, अणूत, पाल्यात, फळात, मातीत, दगडात कुठंही देव सापडतो. खरं तर सहजपणे देव सापडण्यामागं माणसाचीच तशी सोय असते. त्याच्या सोयीनुसार तो सारं काही घडवत राहतो. देवाच्या शोधासाठी तो जटा वाढवून कोणत्या तरी डोंगराच्या टक्कुऱ्यावरही बसतो. स्फोट घडवून बघतो. पृथ्वीचा गर्भ चिरून बघतो. समुद्राचा तळ शोधून बघतो आणि काहीच न करता कणात, मनातही देव सापडल्याचा दावा करतो. स्वत-तही देव बघतो. दुसऱ्यातही बघतो, पशू-पक्ष्यांतही देव बघतो... बघता बघता त्याचा वराह-अवतारही होतो...माणूस स्वत- सारं काही मिळवतो आणि सारं काही देवाचं आहे, असं जाहीर करतो. पूर्वी वारणेच्या खोऱ्यातला दरोडेखोरही दरोडा टाकायला जाताना देवाचा आशीर्वाद मागायचा आणि आता चंद्रावर जाणारा माणूस, पृथ्वीच्या बेंबीचं टोक शोधणारा माणूसही देवाचा आशीर्वाद मागतो. सारं काही देवाचं आहे, तोच हलवतो, तोच चालवतो, तोच बोलवतो, एवढंच काय, त्याच्या आज्ञेवाचून झाडाचं पान हलत नाही, की ते खाली पडत नाही...काय काय करून ठेवलंय माणसानं या देवाचं...देवासाठी तो काहीही करू शकतो...महायुद्धं घडवू शकतो, धर्मस्थळं पाडू शकतो, कुठंही अतिक्रमण करून देवाची प्रतिष्ठापना करू शकतो आणि एवढंच काय, कुणी तरी पुढं जाऊन स्वत-लाच देव जाहीर करून बसतो...अनादी कालापासून देवाच्या कल्पनेचा हा खेळ चालू आहे. कुणी त्याला निर्गुण, निराकार म्हणतं, कुणी द्वैत-अद्वैतात बसवतं...कुणी त्याचा प्रतिनिधी म्हणून अवतरतं...कुणी त्याचा सेवक होऊन स्वत-लाच देवाचा अंश म्हणून जाहीर करतं, तर कुणी देवाला चॅलेंज देण्याच्या प्रयत्नात प्राण गमावून बसतं...पृथ्वी सूर्याभोवती फिरतेय हा सिद्धान्त मांडला गेला तेव्हा काय काय घडलं आठवा...निसर्गातला देव माणसानं स्वत-त आणून अहंब्रह्म म्हटलं तेव्हा काय काय घडलं आठवा...देवाची वाणी न ऐकणाऱ्यांचं काय काय झालं आठवा...एवढंच काय, देवाच्या दर्शनासाठी कुठं पाणी पेटलं आणि कुठं इमारत हलली, हेही आठवा गड्यांनू...

साला, काय अस्त्र वापरलं आज मोलकरणीनं! ग्रेटच आहे ही बाई...मीही या अस्त्राचा विचार करू लागलो... असं अस्त्र, की एका महायुद्धाला जन्मापूर्वीच मारणारं...भ्रूणहत्येप्रमाणं युद्धहत्या करणारं...

खूप विचार करू लागलो देवाचा...पुन्हा पुन्हा विचार करू लागलो...विचार करत करत माणूस चार पायांवरून दोन पायांवर आला...त्यानं आपले पुढचे दोन पाय हे हात म्हणून वापरायला सुरवात केली, तिथंपर्यंत पोचलो...माणूस निसर्गातून बाहेर पडला होता आणि निसर्गाबाहेर जगण्यासाठी त्याला निसर्गाइतकी महाशक्ती हवी होती. निसर्गात जे जे महान आहे, शक्तिमान आहे, त्याची शक्ती कुठून येते आणि ती आपल्याला कधी मिळंल, याचा विचार तो करू लागला...आपल्यापेक्षा काही तरी प्रचंड शक्तिमान आहे, जे क्षय पावत नाही, मरत नाही, ते ते त्याला हवं होतं... त्याला सूर्याप्रमाणं तेजोमय, डोंगरासारखं अचल, सागरासारखं विशाल व्हायचं होतं; पण ते शक्‍य नव्हतं...कारण, माणसाला मरण आहे... सजीवाला मरण आहे... मरण चुकवायचं कसं, शक्तिमान व्हायचं कसं, याची उत्तरं शोधू लागला माणूस...महाशक्तींना शरण जाऊ लागला माणूस...या शक्तींसाठी माणसानं एक शब्द शोधून काढला - देव..! मग देवाचं ठिकाण शोधण्याचा प्रयत्न तो करू लागला...त्याला ते ठिकाण सापडलं स्वर्गात...मग स्वर्गात पोचण्यासाठी माणसानं आत्मा काढला शोधून...आता माणूस मरणार नव्हता... मरणानंतरही आत्म्याच्या रूपानं जगणार होता...त्याचं मरणोत्तर जीवन सुरू होणार होतं...मेल्यानंतर कोणता जन्म मिळणार, याची गणितंही मांडू लागला माणूस...सारे सारे पुनर्जन्म कैद करून त्यानं भरले कोणत्या तरी डेथ किंवा रिबर्थ साइटवर...आता स्क्रीनवरच्या माऊसचा वापर करून क्‍लिक करून तो शोधू शकतो स्वत-चा पुनर्जन्म... प्रश्‍न एवढाच, की मरणानंतर कुणीही हे सारं सांगायला आणि चौकात राहून भाषण करायला परत नाही येत...मला नेहमीच एक प्रश्‍न पडत आलाय...अर्थात, तो साऱ्यांनाच पडतो...वय वाढायला लागलं, की त्याची तीव्रता वाढायला लागते...प्रश्‍न असा, की माणसाला मरण नसतं तर?.. किती छोटा प्रश्‍न; पण उत्तरं आभाळाएवढी...

एक - त्याला देवा-धर्माची गरज भासली असती काय?
दोन - आत्म्याचा विषय जन्माला असता काय?
तीन - स्वर्ग-नरक जन्माला आले असते काय?
चार - मी देवाची भेट घडवून देतो, असा दावा करणारी व्यवस्था जन्माला आली असती काय?
पाच - सोच, साथ क्‍या जानेवाला है, असं चकवा देणारं वाक्‍य जन्माला आलं असतं काय?
सहा - नशिबाची कल्पना जन्माला असती काय?
आणि सात - जितना तेरा है उतनाही तेरा है, असं वाक्‍य कुणी उच्चारलं असतं काय?
अजूनही काही प्रश्‍न आहेतच आहेत... साऱ्यांकडंच ते आहेत...

जगण्याच्या शर्यतीत काही जण ते तुडवत जातात; तर काही जण याच प्रश्‍नांचा इव्हेंट तयार करतात... झालंच तर स्पिरिच्युअल इकॉनॉमी तयार करतात...

पूर्वी काही मुलाखतींत प्रश्‍न विचारले जायचे... देव आहे, की नाही? एका वाक्‍यात उत्तर द्या... उत्तर असायचं, ज्याचा विश्‍वास आहे, त्याच्यासाठी देव आहे आणि ज्याचा विश्‍वास नाही, त्याच्यासाठी देव नाही...

देवावरच्या प्रश्‍नांचं असं उत्तर देऊन मोठे झालेले अनेक बाबू आहेत... टेबलावरच्या काचेखाली देवाचा फोटो ठेवून दोन नंबरचा व्यवहार करणारेही आहेत... माणूस असा दुभंगलेला... देव आहे आणि नाही असं एकाच वेळी सांगणारा... देवाला घाबरणारा आणि न घाबरणारा... देवाकडून महाशक्ती घेऊन स्वत- अमर्त्य होऊ पाहणारा...एकाच वेळी देवाला राजकारणातल्या मतांत आणि मंदिरात बंदिस्त करू पाहणारा माणूस...खरं तर देवाऐवजी "जय हो माणूस!' असंच म्हणायला हवं... माणसानं देवाला गळ्यातील ताइतात, बोटातल्या अंगठीत, लग्नातल्या सुपारीत, तुळशीच्या पानात, कपाळावरल्या कुंकू-भंडाऱ्यात जसं बंदिस्त केलं, तसं वेगवेगळ्या व्याख्यांमध्येही केलं बंदिस्त... व्याख्या तर बघा देवासाठी केलेल्या...

-विश्‍वाचं अस्तित्व इतकं तरल, की त्याचं वर्णनच अशक्‍य आहे. जे काही वर्णन आहे, ती केवळ कल्पना आहे.
(ताओवाद)

- ईश्‍वर हे जगाच्या निर्मितीचं कारण मानल्यास मानवी इच्छेचं स्वातंत्र्य आणि मानवी प्रयत्न याला वाव राहत नाही.
(बौद्ध तत्त्वज्ञान - संदर्भ डॉ. आ. ह. साळुंखे)

-माझा उगम कुणीच जाणू शकत नाही. ज्याला आदि नाही, अंत नाही, अशा सर्व भ्रमांपासून, अनिष्टांपासून मी आहे मुक्त.(भगवद्‌गीता)

-प्रारंभी शब्द होता. शब्द देवासह होता. शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झालं आणि जे काही झालं, ते त्याच्यावाचून झालं नाही.
(नवा करार जॉनकृत शुभ वर्तमान अध्याय - 1-1 - 3)

-तू असं केवळ तत्त्व आहेस आणि तुझ्यातूनच हे सर्व अस्तित्व दृश्‍यमान झालं आहे.(सूफी पंथ)

-एकच असं ते चिरंतन, सार्वत्रिक सत्य आहे. सर्व दृश्‍य-अदृश्‍यांचा निर्माता कालातीत, द्वेषरहित, स्वनिर्मित असे ते "सत्त्व' आहे.(गुरुग्रंथ साहिब)

-सुरवातीला देवानं स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली. कोणत्या पोकळीतून ती निर्माण केलेली नाही, तर जिथं राहता येईल, अशा रीतीनं ती निर्माण केली आहे. हा निर्माता एकमेव आहे.(यहुदी)

या सगळ्या व्याख्या वाचत पुन्हा एकदा "बिग बॅंग'च्या प्रयोगाकडं पाहू लागलो... प्रयोगकर्ते म्हणतात, कण सापडला आहे... जेव्हा एक कण सापडतो, तेव्हा त्याचा अर्थ अद्याप महापर्वत सापडायचा असतो. मेघ कसे दाटतात? पाऊस कसा येतो? बासरीतून सूर कसे बाहेर पडतात? पाकळ्या बाजूला सारून गंध कसा हसतो? अशा आशयाचं गाणंही मराठीत आहे...पुन्हा तेही परमेश्‍वराच्या शोधाचाच एक भाग आहे... शेवटी पुन्हा तोच प्रश्‍न... परमेश्‍वर कणात, मनात, हृदयात, स्फोटात, प्रयोगात, की आणखी कुठं शोधायचा? मोलकरणीनं आणलेल्या भंडाऱ्यातील प्रसादात... उशिरा येऊनही तिच्याशी भांडण न करण्याच्या वृत्तीत, की आणखी कुठं शोधायचा परमेश्‍वर...? मुळात तो शोधायचा का आणि शोधायचाच असंल, तर त्याचा संबंध आपल्या (माणसाच्या) स्वार्थाशी, दुर्बलतेशी, की आणखी कशाशी आहे, याचाही शोध घ्यायला हवा... पण असे प्रयोग झालेले नाहीत, होणारही नाहीत... माणूस आणि त्याचं न दिसणारं भावविश्‍व शोधण्याचे प्रयोग होत नाहीत... आपलं खरं रूप माणसाला दाखवायचं नसतं...भीती वाटते त्याला... स्वित्झर्लंडमध्ये जे झालं ते नीट समजून घ्यायला हवं. तिथं देवकण नाही सापडला, तर देवाच्या कल्पनेप्रमाणं सर्वव्यापी असलेला कण सापडला...त्याला नाव मिळालंय "देव'कण... याचा अर्थ देव शोधण्याची मोहीम संपलेली नाही... ती चालू ठेवायची, की नाही आणि खरंच उद्या देव सापडला, तर काय करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे... 

by - उत्तम कांबळे uttam.kamble@esakal.com

No comments:

Post a Comment

ದಾಸಿಮಯ್ಯನ ವಚನ

ಒಡಲುಗೊಂಡವ ಹಸಿವ;  ಒಡಲುಗೊಂಡವ ಹುಸಿವ  ಒಡಲುಗೊಂಡವನೆಂದು  ನೀನೆನ್ನ ಜರಿದೊಮ್ಮೆ ನುಡಿಯದಿರ ನೀನೆನ್ನಂತೆ ಒಮ್ಮೆ ಒಡಲುಗೊಂಡು ನೋಡ ರಾಮನಾಥ.