डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या जागृतीमुळे बौद्ध समाजातील
स्त्रियांना बाबासाहेबांबद्दल वाटणारा आदर त्या म्हणत असलेल्या ओव्यांमधून
प्रकट झालेला आहे. या महिला निरक्षर असल्या तरी त्यांनी आपल्या ओव्यातून
बाबासाहेबांची थोरवी ज्या ठामपणे आणि प्रगल्भपणे मांडली ती
उच्चशिक्षितांनाही थक्क करणारी होती. या असंख्य ओव्या गोळा केल्या हेमा राईरकर आणि गी प्लॉत्व्हॅं
या दाम्पत्याने. जन्माने फ्रेंच असणारे गी प्लॉत्व्हॅं सामान्यांमध्ये "गी
बाबा' म्हणून प्रसिद्ध होते.डोंगरी संघटनेच्या उभारणीत हेमाताईंचा वाटा
मोठा होता. हेमाताई आणि गी प्लॉत्व्हॅं यांनी या ओव्या गोळा करून त्याचे
विश्लेषण, त्याची सविस्तर माहिती "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचे
आत्मभान' या पुस्तकात दिली आहे. सुगावा प्रकाशनाच्या वतीने हे
पुस्तक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. तीन विभागातील विविध
प्रकरणांमध्ये या ओव्या आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. 334 पानाचे हे पुस्तक
बाबासाहेबांच्यावरील ओव्याची माहिती तर देतेच पण बाबासाहेबांच्या
आयुष्याकडे या स्त्रिया कशा बघत होत्या ते त्यातून कळते. या ओव्यांमध्ये
विविधता आहे त्याचबरोबर या महिलांच्या उत्स्फूर्त भावनाही यातून व्यक्त
झाल्या आहेत. बाबासाहेबांच्या निधनानंतर या समाजाला बसलेला धक्का
आणि त्यांना झालेले दु:ख या ओव्यांमधून प्रकट झालेले आहे. बाबासाहेबांच्या
आयुष्यावर विविध पुस्तके आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. पण या
ओव्यांना खूप महत्त्व आहे. राईरकर आणि गी प्लॉत्व्हॅं यांनी गोळा केलेले हे
अक्षरधन सुगावा प्रकाशनाच्या उषाताई आणि विलास वाघ यांनी प्रसिद्ध करून
खूप मोठे काम केले आहे.
No comments:
Post a Comment