- Prashanth M. Gaikwad
हि नोट पब्लिश करण्यामागचा माझा हेतू सगळ्यांना समजलाच असेल
''धम्मात स्त्रीचे स्थान अतिशय आदरणीय आहे …! '' हे वाचून झालच असेल हे पण एकदा वाचा ..
हिंदुजनांचा –हास आणि अधःपात
प्रबोधनकार ठाकरे भाग ८
आपली
लहान मुले कर्तव्यशील व्हावीत म्हणून हिंदू मातापितरे त्यांच्याजवळून
रामायण वाचून घेतात. राम, सीता, लक्ष्मण यांची माहिती बहुतेकांस लहानपणीच
होते. रामायण वाचणा-या या मुलांच्या मनांवर, इतर काही गोष्टींचा ठसा उमटो,
वा न उमटो, पण त्यातील एक गोष्ट सर्वांच्या लक्षात ठळकपणे राहते. ती कोणती?
रावणाच्या बंदीतून सीता
सोडविल्यानंतर सर्व सैनिकांसमक्ष सीतेने अग्निप्रेवश करून आपले पावित्र्य
निष्कलंक असल्याचे सिद्ध करून दाखविल्यानंतर रामाने तिचा स्वीकार केला
होता. पण पुढे अयोध्येस आल्यावर कोणा एका सामान्य मनुष्याने सीतेच्या शुद्ध
शीलाबद्दल किंचित संशय व्यक्त करताच, रामाने पुढचा मागचा काहीत विचार न
करता, सीता पूर्ण नऊ महिन्यांची गरोदर आहे हेही विचारात न घेता, तिला
ताबडतोब अरण्यात हाकलून दिली. आणि हे इतके का ?
तर प्रजेची
एक छचोर लहर सांभाळण्यासाठी! दैवी रामरायाने जे हे मोठे शतकृत्य केले
त्याचे अनुकरण तुमची कर्तव्यशील हिंदु बाळे करावयास चुकतील अशी का तुमची
समजूत आहे? असेल तर ती साफ चुकीची आहे. किती तरी बालसीता यापूर्वी या
हिंदुस्थानात शोकभाराने मृत्युवश झाल्या आहेत. आणि मी खात्रीलायक सांगतो
की, आजही कित्येक कजाग सासवा व नणंदा यांच्या वृथा संशयाला बळी पडलेल्या
शेकडो बालसीता आपले अभागी आयुष्य रडण्यात कंठीत आहेत.
आजच्य आधुनिक कर्तव्यपरायण रामांची हृदये कठीण करण्याकरता अयोध्येच्या कुटाळ प्रजेची भूमिका या आजकालच्या सासवा आणि नणंदा घेत असतात.
असल्या
रानटी व राक्षसी चित्राला रामायणात दैवी रंग चढविल्यामुळे किती तरी
हिंदुंच्या संसारांचा हकनाहक नाश झालेला आहे. आणि किती तरी मुग्ध
बालिकांच्या जीवनसर्वस्वाचा होम झालेला आहे.
असल्या
पवित्र ग्रंथातील भूमिकेवर हिंदु-भारतवर्षाचे आजचे गृहजीवन उभारलेले आहे.
धार्मिक भावनाशील किंवा आदर्शपूजना करणारे लोक यांचा यांच्यात फारसा दोष
नाही. त्यांना बालपणापासून जे शिक्षण दिलेले असते, त्याची त्यांच्या
मनःपटलावर जी चित्रे कोरली जातात, तीच कायम ठशाने जन्मभर तेथेच टिकून
राहतात.ज्या ब्राह्मण लेखकाने रामाला अशा रानटी स्वरूपात जनतेपुढे उभा केला
आहे. त्याकडे वास्तविक खरा दोष येतो. त्यातही पुन्हा या रामायणाचे सुद्धा
प्रसंगाप्रमाणे आणि सोईप्रमाणे कित्येक वेळ शोधन आणि नवीन संपादन झालेले
आहेच.
आज आमच्या हातात पडणारे रामायण हे खास काही मूळचे वाल्मिक
रामायण नाही आणि विद्वानांच्या मते हल्ली उत्तररामचरित्र या नावाने जो भाग
प्रसिद्ध केला आहे तो तर हमखास कुठल्या तरी दूर धोरणाने मागाहून कोणीतरी
घुसडून दिलेला असला पाहिजे. हे दूर धोरण काय असावे याची आपण लवकरच मीमांसा
करू.
ज्या शहाण्याने हे उत्तररामचरित्र निर्माण
केले, त्याला सीतादेवी वरच्या नसत्या संशयाची पुनरावृत्ती टाळता आलीच नसती
काय? अग्निदिव्याने संशयाची निवृत्ती जनजाहीर झाली असताही त्या लेखकाने
काढलेले गरीबा बिचा-या सीतामाईचे पुढचे धिंडवडे त्याला का टाळता आले नाहीत?
त्यात त्याने काय साधले? सीतामाईविषयीच्या संशयाचा पुनश्च पराचा कावळा
करून नाचविण्याचा या उत्तररामचरित्रवाल्याचा हेतू, हिंदू स्त्रियांना एक
सणसणीत कायमचा दम भरून ठेवण्यात आढळतो. त्याला स्त्रीजातीला बजावून
ठेवावयाचे होते की, याद राखा, तुम्ही कितीही शुद्ध आणि सद्गुणी असलातरी
तुमच्याविरुद्ध लवमात्रही वेडावाकडा शब्द ऐकू आला तर, तुम्हाला बिलकूल
दयामाया न दाखविता, तुमची चौकशीसुद्धा न करता केवढी भयंकर शिक्षा तुमच्या
नव-यांकडून फर्माविण्यात येईल, हे नीट ध्यानात ठेवा. संशयाच्या नुसत्या
चुटपुटत्या कल्पनेचाही वारा तुमच्या बाबतीत आम्हा पुरुषांना क्षणमात्र
खपणार नाही.उपदेश करण्याच्या दिमाखाने चितारलेल्या या खोडसाळ शब्दचित्राने
सीतामाईच्या चारित्र्याला मुळीच धक्का लागलेला नाही. ते कमलपात्राप्रमाणे
निष्कलंक आणि अवधूतच राहिले. स्त्रीजातीच्या सद्गुणांची दिव्य प्रतिमा
म्हणून तिचा महिमा युगानुयुगे अधिकाधिक प्रकाशमानच होत आहे. पण – पण त्या
तुमच्या आदर्शभूत दैवी रामाच्या पौरुषाचे घाणेरडे चित्र म्हणजे
हिंदुस्थानाच्या पौरुषत्वाला नामुष्की आणणारी एक चिरंजीव शरमेची बात होऊन
बसले आहे.
रामाला अनेक इतर ठिकाणी नीतिमत्तेचा आणि
आत्मत्यागाचा केवळ पुतळा असा रंगविलेला आहे. त्या रंगवटीला अनुसरूनच,
रामायण-लेखकाने खालच्या सारखे त्याचे चित्र रंगविले असते, तर किती तरी
चांगले झाले असते? अयोध्येच्या लोकांनी सीतेच्या पावित्र्याबद्दल शंका
घेताच, रामाने ताबडतोब एक जंगी दरबार भरवून लोकांना जाहीररीतीने सांगायचे
होते की ``नागरिक जनहो, तुम्हाला माझ्या महाराणीबद्दल काही संशय येत आहे.
माझ्याबरोबर सिंहासनी तिने बसू नये, असे तुम्हाला वाटत आहे काय? ठीक आहे.
तर मग मला या राज्याचीच पर्वा नाही. आत्ताच्या आत्ता सर्व राज्यसूत्रे
भरताच्या स्वाधीन करून सीतेसह मीच अरण्यवासाचा रस्ता पत्करतो. तुमचा संशय
काहीही असला तरी सीतेच्य पावित्र्याबद्दल माझी बालंबाल खात्री झालेली आहे.
मला इतरांच्या कुटाळक्यांकडे लक्ष देण्याचे मुळीच कारण नाही. प्रजाजनहो नीट
विचार करा. सीतादेवी माझी वाग्दत्त विवाहबद्ध पत्नी आहे. ती पूर्ण
दिवसांची गर्भवती असून, लवकरच तिला मातृपदही प्राप्त होणार आहे. अशा
अवस्थेत केवळ तुमच्या संशयाच्या लहरीचे रंजन करण्यासाठी मी जर तिचा त्याग
करीन तर राक्षसात आणि माझ्यात फरक तो काय?’’ मी जसा तुमचा राजा हे, तसा
सीतेचाही राजा आहे. तुमच्याप्रमाणेच तिनेही जर न्यायाची मागणी केली, तर
राजा या नात्याने कोणत्या तोंडाने मला ती नाकारता येईल सांगा. मी जर ही
तिची न्यायाची मागणीच मान्य केली नाही, तर राजपदालाच काय, पण माणुसकीलाही
मी नालायक ठरेन.’’
अशा त-हेने रामाची भूमिका जर रंगविली असती, तर
रामायणातला राम आमच्या हिंदू राष्ट्राचा एक नमुनेदार पुरुषोत्तम (हीरो)
म्हणून खास शोभून दिसला नसता काय?
लक्ष्मणाचीही मोठी
स्तुती गाण्यात येते. का? तर म्हणे रावणाची बहीण जी शूर्पणखा, तिने
लक्ष्मणाशी प्रेमाचा लघळपणा केला म्हणून त्याने तिचे नाक-कान छाटले. या
गोष्टीचा आमच्या तरुणांच्या मनांवर किती घाणेरडा विकृत परिणाम होत असतो.
याची कोणाला कल्पना तरी आहे काय? शूर्पणखेने स्त्रीस्वभावानुसार कितीही
लघळपणा केला, तरी लक्षअमणाला त्या स्त्रीशी सौजन्याने दयाळूपणाने व
दिलदारपणाने खास वागता आले असते. वाटेल त्या क्षुद्र कारणांवरून बायकांची
नाके कापणे, किंवा इतर रीतीने त्यांना विद्रूप करणे, हा हिंदू पुरुषाचा
मर्दपणा एकंदरीत बराच प्राचीन लौकिकाचा आहे
.
हेच
काय, पण बायकांना पशुप्रमाणे क्रूर रीतीने वागविण्याच्या हिंदू
पुरुषांच्या ब-याचशा दुष्ट चालींचा उगम, आदर्श म्हणून डंका पिटलेल्या या
राम लक्ष्मणाच्या जोडीच्या चरित्रचित्रातच सापडतो. उत्तररामचरित्राच्या
शेवटी लक्ष्मणाबद्दल एक दुःखद गोष्ट वर्णन केलेली आहे. राम कोणातरी
ति-हाईताशी एकांतात बोलत बसला होता. राज्यकारभाराच्या काही महत्त्वाच्या
गोष्टींबद्दल लक्ष्मणाला भेट घ्यायची होती. भानगड तर मोठी जरूरीची.
क्षणाचाही विलंब नको होता. म्हणून लक्ष्मण तसाच आत गेला. झाले, रामरायाचा
एकांत बिघडला. लक्ष्मणाने केलेल्या या भयंकर अपराधाबद्दल त्याला शिक्षा
ठोठावण्यात आली की `मरेपर्यंत पुन्हा मला तोंड दाखवू नकोस.’
रामासाठी
सारा जन्म लक्ष्मणाने जे अकृत्रिम बंधुप्रेम व भक्तीची निस्सीम सेवा केली,
ती निमिषार्धात क्षुल्लक गैरसमजासाठी चुलीत गेली! या असल्या `पवित्र’
उदाहरणांचा परिणाम हिंदू समाजावर कसा झाला व होत आहे, हे पाहायचे असेल तर
जरा हायकोर्टाच्या आणि स्मॉल कॉजेस कोर्टांच्या खटलेबाजीकडे लक्ष द्या.
वडिलार्जित इस्टेटीच्या तुकड्यांसाठी एकमेकांच्या उरावर बसणा-या शेकडो
राम-लक्ष्मणांच्या जोड्या तेथे तुम्हाला भेटतील. `
प्रबोधनकार ठाकरे या महापुरुषाला लाख-लाख प्रणाम.
No comments:
Post a Comment