Wednesday, September 19, 2012

मातृभाषा


हल्ली विविध प्रांतीय भाषांमध्ये चौथी-पाचवीपासून इंग्रजीचा संपर्क होईल, असे पाठ्यक्रम तयार केले आहेत. उच्च शिक्षण घेतेवेळी बालकाची आकलनक्षमता वाढलेली असते. तो इंग्रजी शब्दांना सहजपणे परिचित होतो व आत्मसात करतो. अगदी लहानपणी मुलगा इंग्रजीविषयी अनभिज्ञ असतो व त्याची आकलनशक्तीही कमी असते. म्हणून त्याच्यावर परकीय भाषेचा बोझा टाकणे अयोग्य आहे. त्याने केलेले इंग्रजी पाठांतर हे नुसती घोकंपट्टी असते. आपला मुलगा मातृभाषेतून शिकला, तर तो कमजोर राहील, हा गैरसमजच पालकांनी मनातून काढून टाकला पाहिजे. शेजार्‍याचा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकतो म्हणून आपल्याही मुलाला इंग्रजीतूनच शिकवावे, ही मानसिकता बरोबर नाही. केवळ एक फॅशन म्हणून किंवा इतरांनी कौतुक करावे म्हणून पहिल्या दिवसापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकून मुलाचे नुकसान करणे योग्य नाही. आपल्या मातृभाषेवर प्रेम करणे, त्यातून शिक्षण घेणे गौरवास्पद आहे.

काही काही पालक आपल्या मुलांवर कुटुंबातील व्यक्तींशी रोजचे व्यावहारिक बोलणे सुद्धा इंग्रजीमधून करण्याची सक्ती करतात. हा तर अतिरेकच झाला म्हणायचा. हे म्हणजे आपली सांस्कृतिक अस्मिताच नष्ट करणे होय. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात तो मोठा अडसर ठरू शकतो.

स्वातंत्र्यपूर्व काळात असा ठराव झाला होता की, स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा हिंदी असेल. ठिकठिकाणचे लोक हिंदी शिकू लागले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे यात तत्कालीन दक्षिणी प्रांत मद्रास, केरळ आघाडीवर होते. हिंदी भाषेला वातावरण अनुकूल होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केंद्रीय सचिवांचा एक गट पंतप्रधानांकडे गेला आणि विनंती केली की, देशाचा संपूर्ण कारभार राष्ट्रभाषा हिंदीतून चालविण्याची आमची तयारी आहे. आपण तशा लेखी आज्ञा द्याव्या. नोकरशाहीबद्दल सामान्यपणे अशी ओरड असते की, सरकारचे चांगले निर्णय ते अमलात आणीत नाहीत, इथे तर खुद्द नोकरशहांनीच हिंदीतून राज्यकारभार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मग माशी कुठे शिंकली? तर आमचे लाडके पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, ज्यांच्याविषयी असे म्हटल्या जाते की ते संस्कृतीने मुसलमान, शिक्षणाने इंग्रज तर केवळ अपघातानेच हिंदू होते, ते एकाएकी भडकले व म्हणाले, ‘‘छे, छे हिंदी ही काय भाषा आहे? स्वतंत्र भारताची राज्यकारभाराची भाषा इंग्रजीच राहणार.’’ स्वराज्य आलं, पण स्वभाषा न आल्यामुळे स्वराज्याचा अस्मिताविहीन प्रवास कण्हत कुंथत कसा तरी चालू आहे.

पहिल्या जागतिक महायुद्धाने (१९१४-१८) तुर्कस्थानला एक कर्तबगार महान राष्ट्रनेता दिला. त्याचं नाव कमाल पाशा. कमाल द-अतातुर्क. कमाल रणांगणावर तर तळपला होताच, पण समाजजीवन आणि राज्यकारभारातही त्याने क्रांती घडवली. कमालने तुर्कस्थानात आधुनिक सुधारणेचे युग आणले. तुर्की फेज टोपी, बुरखा, पैजामा शेरवानी, दाढी इत्यादी गोष्टी हद्दपार केल्या. शरियत कायद्याच्या जागी आधुनिक कायदा आला. युरोपियन पद्धतीचा सुटाबुटाचा पोषाख आला, स्त्रिया बुरख्याविना मोकळेपणाने फिरू लागल्या. बराचसा कारभार इंग्रजीतून चालू होता. लोकांना व अधिकार्‍यांना वाटलं की राज्यकारभाराची भाषा इंग्रजीच चालू राहील. कमालने अधिकार्‍यांशी विचारविनिमय केला आणि लेखणीच्या एका फटकार्‍यानिशी दुसर्‍याच दिवशीपासून राज्यकारभार तुर्की भाषेतून झाला पाहिजे असे आदेश दिले. सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण नंतर हळूहळू सर्व सुरळीत होत गेले. समाजाची राष्ट्रीय अस्मिता जागृत ठेवण्यासाठी स्वभाषा किती निर्णायक ठरू शकते, याची पुरेपूर जाण कमाल पाशाला होती. शिवाय कुणाही भाषिक गटाला खूष करण्याची मतांचे राजकारण करण्याची त्याला गरज नव्हती. म्हणूनच राष्ट्रीय हिताचे निर्णय त्याला कणखरपणे घेता आले. राबवता आले. ती राजकीय इच्छाशक्ती कमाल पाशाजवळ होती. म्हणून तो महान नेता ठरला.

एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिबिर चालू होते. त्यात जिज्ञासा समाधान हा प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम होता. प्रशिक्षणार्थ्यांनी प्रश्‍न विचारायचा व सरसंघचालकांनी उत्तर देऊन समाधान करायचे, असा तो कार्यक्रम होता.

एका शिबिरार्थ्याने सरसंघचालकांना विचारले, ‘हल्लीच्या इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावात मातृभाषेतून शिक्षण घेणे योग्य आहे काय?’ प्रश्‍न फार चांगला होता. त्यावर सरसंघचालकांनी मार्मिक उत्तर दिले, ते असे- केवळ प्राथमिकच नव्हे, तर माध्यमिक वर्गांपर्यंतचे शिक्षण देखील मातृभाषेतून झाले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते व विषय समजायला सोपे जाते. माध्यमिक वर्गापर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. नंतर दुसर्‍या कुठल्याही भाषेतून संगणकाप्रमाणे आपला मेंदू मातृभाषेत त्याचे भाषांतर त्वरित करतो आणि निर्णयक्षमता वाढवितो.

आपले म्हणणे सोपे करून सांगण्याकरिता महाभारतातील उदाहरण देत म्हणाले, ‘महाभारतातील पितामह भीष्म, भीम यांच्याबद्दल आपल्याला माहिती असल्याने ‘भीष्मप्रतिज्ञा, भीमपराक्रम’ म्हणजे काय ते लगेच कळते. त्याचा अर्थही कळतो. ‘हरक्युलस’बद्दल माहिती असेल तर ‘हरक्युलिअन टास्क’ म्हणजे काय ते कळेल. ‘राधिके तुने मेरी बन्सुरी चुरायी.’ आता ज्याला हे पवित्र नाते ठावूक आहे त्याला यातील भावार्थ कळेल. पण ज्याला हे नाते माहिती नाही त्याला त्याचा अर्थ आणि भावार्थ कळणार नाही. आजच्या इंग्रजी माध्यमाप्रमाणे तो त्याचे भाषांतर असे करेल- ‘राधा हॅज स्टोलन माय फ्ल्यूट देन व्हॉट? गो टु पोलिस स्टेशन ऍण्ड रिपोर्ट.’ प्रश्‍न करणार्‍या शिबिरार्थ्याला त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले होते.

                                                                        वसंत वि. कुळकर्णी, नागपूर
ಕೃಪೆ : ತರುಣ ಭಾರತ (ಮರಾಠಿ ದೈನಿಕ)

No comments:

Post a Comment

ದಾಸಿಮಯ್ಯನ ವಚನ

ಒಡಲುಗೊಂಡವ ಹಸಿವ;  ಒಡಲುಗೊಂಡವ ಹುಸಿವ  ಒಡಲುಗೊಂಡವನೆಂದು  ನೀನೆನ್ನ ಜರಿದೊಮ್ಮೆ ನುಡಿಯದಿರ ನೀನೆನ್ನಂತೆ ಒಮ್ಮೆ ಒಡಲುಗೊಂಡು ನೋಡ ರಾಮನಾಥ.